Ajit Pawar : पैसे काबाडकष्ट केलेले की सिंचन घोटाळ्यातले? गाड्या गिफ्ट देण्यावर दमानियांनी उपस्थित केला प्रश्न

Ajit Pawar : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अजित पवारांचा गट सत्तेत सामिल झाल्यानंतर त्यांच्या गटाची ताकद राज्यात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवारांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना गाड्या देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वाधिक लाभ पुणे जिल्ह्यात होण्याची शक्यता असून पुण्याला तीन किंवा चार गाड्या मिळणार आहेत.
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसाठी सुमारे ८० गाड्या घेतल्या जाणार आहेत. यादरम्यान सामजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मात्र अजित पवार यांच्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी या गाड्या खरीदीच्या मुद्द्यावर हल्ला चढवला असून या गाड्यांसाठी येणारा पैसा सिंचन घोटाळ्यातील आहे का? की अजित पवारांनी कष्ट करून कमवला असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबद्दल प्रश्न विचारले आहेतय. “जो पक्ष अजुन पक्ष म्हणून घोषित पण झाला नाही , त्या पक्षाने इतक्या अफाट गाड्या कुठून घेतल्या? पैसा कुठून आला? कोणी देणग्या दिल्या? आता ED / ACB आणि EC ने डोळे मिटून घेतले आहेत का?” असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

“हे सगळे सिंचन घोटाळ्यातले पैसे आहेत? का अजित पवारांनी काबाड कष्ट करून कमावलेले पैसे? कुठून येतात एवढल्या गाड्या? सामान्य माणसाला एक गडी घेतांना देखील नाके नऊ होते” अशी दुसरी एक पोस्ट देखील दमानिया यांनी केली आहे.

 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जिल्हाध्यक्षाला कार देण्याची घोषणा केली होती. पदाधिकाऱ्यांना आपापल्या भागात फिरण्यासाठी तसेच पक्षाच्या प्रचारासाठी या गाड्या देण्यात येणार आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या स्कॉर्पिओ आणि बोलेरो गाड्यांची यासाठी टेस्टिंग सुरु आहे.