सरकारमध्ये का सामील झालो ? ; अजित पवारांनी मांडली स्पष्ट भुमिका

मुंबई : शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला नंतर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हासाठी आता निवडणूक आयोगापुढे ही लढाई सुरू झाली आहे. एकीकडे ही राजकीय लढाई सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी होऊन आज १०० दिवस झाले आहेत. त्यानिमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते अजित पवार यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. या पत्राद्वारे अजित पवारांनी राष्ट्रवादीची सरकारमध्ये सामील होण्यामागची भूमिका आणि पुढील वाटचालीची दिशा मांडली आहे.

वसा विकासाचा–विचार बहुजनांचा हे समाजकारणाचं सूत्र आहे. महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या राजकीय बंडाचा अप्रत्यक्ष उल्लेख करत महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात प्रत्येक मोठ्या नेत्याने वेगळी राजकीय भूमिका त्या त्या वेळेनुसार आणि काळानुसार घेतल्याचे त्यांनी पत्रातून म्हटले आहे. राजकीय वाटचालीकरिता स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या बहुजनांना सत्तेच पाठबळ देण्याच्या भूमिकेची प्रेरणा आम्ही घेतली आहे. तसेच, ले–शाहू–आंबेडकरांच्या मार्गावरच राष्ट्रवादी पक्ष वाटचाल करणार याची ग्वाहीही अजित पवारांनी दिलीय.

लोकाभिमुख राजकारण व समाजकारण तसेच सकारात्मक आणि विकासात्मक राजकारणावर भर देणार असल्याचे अजित पवार यांनी या पत्रातून म्हटलं आहे. तर, पत्राद्वारे आशीर्वाद आणि साथ देण्याचं आवाहनही त्यांनी जनतेला केलंय. दरम्यान, टीका करणे हा राजकारणाचा अविभाज्य भाग बनला आहे. मी सकारात्मक टीकेचं नेहमीच स्वागत केलय. मात्र, केवळ टीका करण्यासाठी, राजकीय हेतूने टीका करणे हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक कामावर आणि विकासात्मक राजकारणावर विश्वास ठेवणारा कार्यकर्ता आहे. लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा पिंड आहे, असे म्हणत अजित पवार यांनी आपण घेतलेली भूमिका कशी बरोबर आहे, हेच या पत्रातून मांडलं आहे.