मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘पॉवरफुल्ल’ नेते अजित पवारांच्या नाराजी नाट्याने आज महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान आज अजित पवार राष्ट्रवादीमधून बाहेर पडतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच अजित पवारांनी फेसबुक, ट्विटरवरून राष्ट्रवादीचं चिन्ह हटवलंय.
अजित पवार यांनी त्यांच्या फेसबूक आणि ट्विटर अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेस, घड्याळ चिन्ह आणि शरद पवार यांच्यासह स्वतःचा फोटो असलेला वॉलपेपर डिलिट केलाय. अजित पवार यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर वॉलपेपर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव, चिन्ह आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अजित पवारांचा फोटो होता. ते फोटो अजित पवारांनी डिलिट केलाय.
मात्र अजित पवारांनी या बातम्यांमध्ये कुठेलेही तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही. मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांच्या या विधानानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील अजित पवारांच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. ही केवळ तुमच्या मनातली चर्चा आहे. या सर्व बातम्या खोट्या आहेत.
अजित पवारांनी कुठलीही बैठक बोलावलेली नाही. मी एकदा स्पष्ट सांगितल्यानंतर तुम्हाला फाटे फोडण्याचा अधिकार नाही. सगळे सहकारी पक्षाला मजबूत करण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा शरद पवारांनी केल्यानंतर काही वेळानंतर अजित पवार यांनी सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीचा ÷उल्लेख हटविला.