अजित पवार संतापले, म्हणाले, मला विनाकारण ट्रोल केलं जातंय

पुणे : राज्य सरकारकडून खासगी कंपन्यांकडून कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती केली जात असल्याने सरकारवर जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे. कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय मागच्या सरकारच्या काळातलाच आहे. तो निर्णय आत्ताचा नाही. त्या काळात कुणाकुणाच्या त्यावर सह्या आहेत हेही मी दाखवायला तयार आहे. आज ते सरकार नाही म्हणून लगेच आमच्या नावाने पावत्या फाडायचं, आम्हाला बदनाम करायचं काम चालू झालं. मलाही कळतं. मीही ३२ वर्षांपासून महाराष्ट्रात काम करतोय, अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली.

काही विभागात काही हजारांत कर्मचारी कमी आहेत. त्यांच्या भरतीची प्रक्रिया सध्या चालू आहे. काही ठिकाणी टाटाला आपण भरती करायला सांगितलं आहे. तीन कंपन्या आपण निवडल्या आहेत. त्याशिवाय एमपीएससीकडून भरती केली जाते. काही ठिकाणी ताबडतोब माणसं लागतात. उदाहरणार्थ ३० हजाराची शिक्षकभरती. मागच्या सरकारच्या काळात काय घडलं आणि कुणाकुणावर कारवाई करण्यात आली हे आपल्यासमोर आहे, असंही अजित पवार म्हणाले. मात्र कारण नसताना मला ट्रोल करायचं काम चालू आहे. आमच्या विरोधकांना उकळ्या फुटतात आणि काहीही व्हॉट्सअॅप व सोशल मीडियावर वेगळ्या बातम्या पसरवतात, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

कधीकधी काहीजण कोर्टात जातात. कोर्टानं काही सूचना केल्या तर त्याचं पालन करावंच लागतं. कारण ते त्यांचे आदेश असतात. शिक्षक विभागात नवे शिक्षक भरती होईपर्यंत मुलांना सांगता येत नाही की भरती होईपर्यंत तुम्हाला त्या विषयाला शिकवायला कुणी नाही. म्हणून आम्ही निवृत्त झालेल्यांना तात्पुरतं भरती करून घेतलं, असं अजित पवारांनी नमूद केलं. तरुण-तरुणींचे काय प्रश्न आहेत, बेरोजगारीचे काय प्रश्न आहेत हे आमच्याही डोळ्यांसमोर आहेत. ते दूर करण्यासाठी आपण दीड लाखांची भरती करत आहोत. काही ठिकाणी तातडीने माणसं लागतात यासाठी तात्पुरत्या स्वरुपात माणसं भरली. कायमस्वरूपी नाही, अशी भूमिका अजित पवारांनी यावेळी मांडली.