कराड : वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या बेताल वक्तव्यांमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होत आहे. यावर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार यांनी कराड येथे चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केलं. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला. यावेळी अजित पवार म्हणाले, अलिकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढलेली दिसतेय.
अजित पवार म्हणाले, सगळ्याच पक्षांमध्ये वाचाळवीर वाढले आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आपण कशा प्रकारे करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु, रोज आपण बघतो कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतो. कोणी अरे म्हटलं की, का रे म्हणायचं असं सगळं चालू आहे. ही यशवंतराव चव्हाणांची शिकवण नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. मी सगळ्याच पक्षांबद्दल बोलतोय. यामध्ये आम्ही (राष्ट्रवादी काँग्रेस) आलो, सगळेच आले. मी ठराविक कोणाबद्दल बोलत नाही. एका व्यक्तीला बोलत नाही. माझ्यासह सर्वांनीच आत्मपरिक्षण करायला हवं.
दरम्यान, यावेळी अजित पवार यांना छगन भुजबळांच्या वक्तव्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, मी कोणाचं नाव घेऊन बोलत नाही. मी तुम्हा पत्रकारांचा मान ठेवला, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. मी कोणालाही डोळ्यासोर ठेवून बोलत नाही. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील सगळ्यांसाठीच बोललो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.