मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही बोलल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडतायत, असा सवाल त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत टोलाही लगावला. मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुणाच्या अंगाला का लागावं? मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निकाल आलाय, त्याबाबत सरकारनं त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ज्ञ लोकांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन यावर तातडीनं काय करता येईल यावर विचार केला पाहिजे, असं असं अजित पवार यांनी नमूद केलं. कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी, असं स्पष्ट केलं. खारघरसंदर्भात मी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. ही गंभीर बाब आहे, म्हणून मी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केली.
फेब्रुवारी २०२२ मध्ये राज्यात जिल्हापरिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार होत्या. तेव्हा अनेक इच्छुकांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरतबाजी केली, कामं केली, देवदर्शन केली, झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले केव्हा निवडणूक लागते हा विचार करून. त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बसू, चर्चा करू, महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, मागच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मविआच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.