मुंबई: गेल्या काही दिवसांपासून खातेवापट आणि मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होती. आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाचा मुद्दा अखेर निकालात निघणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी काहीवेळापूर्वीच खातेवाटपाची यादी घेऊन राजभवनावर पोहोचले आहेत. आता याठिकाणी राज्यपाल रमेश बैस हे खातेवापटाच्या यादीवर स्वाक्षरी करतील. आज संध्याकाळपर्यंत मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर होणार आहे.
मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचल्याच्या वृत्ताला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला आहे. अजितदादा म्हणाले की, आज संध्याकाळपर्यंत खातेवाटपाची यादी जाहीर होईल. खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे. राज्यपालांची सही झाल्यानंतर त्याबाबत आदेश निघेल आणि कोणाला कोणती खाती मिळाली, हे समजेल, असे अजित पवार यांनी सांगितले. मात्र, कोणाला कोणते खाते मिळाले, याबाबत स्पष्टपणे बोलण्यास अजित पवार यांनी नकार दिला.
कोणाला कोणतं खातं द्यायचं हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा असतो. आम्ही त्यांच्या मंत्रिमंडळात आहोत, ते देईल ते खातं आम्ही घेतो. आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची आमची मानसिकता आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे या सगळ्यांना कोणती खाती मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.