मुंबई : तुम्ही बंड केले तेव्हा तुमचे लोक पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तुमचे बंड यशस्वी झाले मात्र मला माझ्याच माणसांनी साथ दिली नाही, अशी खंत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना अजित पवारांनी हे विधान केले. यामुळे अजित पवार यांच्या मनात आजही पहाटेच्या फसलेल्या शपथविधीचे शल्य असल्याचे दिसून आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत राहून बंड केले आणि त्यांना या बंडात त्यांच्या आमदारांनी खंबीरपणे साथ दिली. पण जेव्हा मी बंड केले तेव्हा मात्र माझे आमदार माझ्या पाठीशी उभे राहिले नाही, अशी व्यथा त्यांनी यानिमित्त व्यक्त केली.
पहाटेच्या शपथविधीवरुन वेळोवेळी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी उडत असतात. तसेच दावे आणि प्रतिदावेही केले जातात. यात अलिकडेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानांमुळे शपथविधीचे कोडे हळूहळू उलगडू लागले आहे.
त्यातच अजित पवारांनी विधानसभेत केलेल्या विधानामुळे दादांच्या मनात पहाटेच्या फसलेल्या शपथविधीचे शल्य अजूनही कायम असल्याचे म्हटले जात आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. त्यावेळी त्यांच्या भाषणातील एका मुद्द्याचा धागा पकडून दादांनी ही टिप्पणी केली आहे. येत्या काळात पहाटेच्या शपविधीचे गुढ अधिक उकलणार असल्याचे या विधानावरुन दिसून येत आहे.