मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत समर्थक नेते आणि आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. दरम्यान, त्यांचे खंदे समर्थक असलेले आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्रामध्ये लवकरच अजित पर्व सुरू होईल, असं ट्विट केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमदार अमोल मिटकरी यांनी हे खास ट्विट केलं आहे. ‘’मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’’ अशा आशयाचं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलंय. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांच्याकडे वित्तमंत्री पद देण्यात आले आहे. सध्या ते उपमुख्यमंत्री असले तरी मात्र पुढच्या काळात एकनाथ शिंदे यांना हटवून अजित पवार यांच्याकडे राज्याचं मुख्यमंत्रिपद दिलं जाईल, असा दावा संजय राऊतांसह महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे मिटकरी यांनी केलेलं ट्विट हे त्याचेच संकेत तर नाहीत ना, असा अंदाज वर्तवला आहे.