अजित पवार भाजपसोबत जाणार?, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचे ट्विट केले होते. तर या ट्विटमुळे राजकारणात नवा भुकंप होणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. याबाबत खासदार संजय राऊत  यांनी  स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं आहे. संजय राऊत यांनी आज दुपारी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.

काय म्हणाले संजय राऊत? 
अंजली दमानिया यांना भाजपाकडून ही माहिती मिळाली असेल तर त्यांनी ती जाहीर केली असेल. पण अजितदादा असं काही करतील असं मला तरी वाटत नाही. ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत. त्यांचं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे. तसेच ते स्वाभिमानी आहेत, त्यांचा कणा नेहमी ताठ असतो. अजित पवार हे बाणेदार असं नेतृत्व आहे ते जाऊन मिंध्याप्रमाणे गुलामी करतील असं मला वाटत नाही. संजय राऊत म्हणाले, शेवटी प्रत्येकजण व्यक्तिगत काही निर्णय घेत असतात. परंतु मी अजित पवारांना जितकं ओळखतो, अलिकडे जे काही पाहिलंय त्यावरून सांगेन की, अजित पवार कोणाचे मांडलिक म्हणून काम करतील, असं मला वाटत नाही.