नागपूर : महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजताच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, असे वृत्त असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठं विधान केलं आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा अधिकार पूर्णतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा असतो, असं अजित पवार यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला आहे. याबाबत आज, सोमवारी अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केली. त्यावर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचं उत्तर अजित पवार यांनी दिलं.
सध्या आपल्यासमोर दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, कांदा, इथेनॉल आदी वेगवेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीला प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा पूर्ण अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो. ते निर्णय घेतील तेव्हा तो होईल, असे पवार यांनी सांगितले.
दिल्लीला जाणार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत जाणार आहेत. यासंदर्भातही पवार यांनी माहिती दिली. राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पावसामुळं झालेले नुकसान, कांदा आदी प्रश्नांवर बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहोत. अमित शहा आणि संबंधितांच्या भेटी घेऊन चर्चा करणार आहोत, असेही पवार यांनी सांगितले.
दिल्लीत सोमवार किंवा मंगळवारी जाऊ असं फडणवीस म्हणाले होते. हिवाळी अधिवेशन सुरू आहे. इथले कामकाज लक्षात घेऊन जावे लागणार आहे. तशा प्रकारचे नियोजन होणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना अद्याप मदत दिली नाही, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. मधल्या काळात कॅबिनेटमध्ये संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना तशा सूचना केल्या होत्या. नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करा असे सांगितले होते.
त्यानुसार अनेक मंत्री, पालकमंत्री वेगवेगळ्या भागांत जाऊन पाहणी करून आले. पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या होत्या. युद्धपातळीवर काम सुरू आहे. पंचनामे झाल्याशिवाय पिके, फळबागा आदींचे किती नुकसान झाले आहे, त्याची आकडेवारी समोर येणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.