अध्यक्षपदाचा राजीनामा; अजित पवारांचे शरद पवारांवर गंभीर आरोप

मुंबई : ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजीनामा मागे घेण्यासंदर्भात छगन भुजबळांपासून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विनंती केली. यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. यासंदर्भात अजित पवारांनी शरद पवारांवर गंभीर व खळबळजनक आरोप केले आहेत.

कर्जतमध्ये अजित पवार गटाच्या शिबिरात बोलतांना अजित पवार म्हणाले की, “आम्हाला सातत्यानं गाफील ठेवण्यात आलं. प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला तिथे बोलवून घेतलं. सगळं ऐकल्यानंतर तिनं सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते. असे सुप्रिया म्हणाल्याचा दावा अजित पवारांनी आपल्या भाषणात केला.

पुस्तक प्रकाशन समारंभाच्या एक दिवस आधीच राजीनामा देण्याचा निर्णय झाला होता, असं अजित पवार म्हणाले. मात्र त्यानंतर “आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक महिला व युवक पाहिजे. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठराविकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगतायत”, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी यावेळी केला.