अजित पवारांच्या शाब्दिक कोट्यांनी विधानसभेत हास्याचे फवारे; वाचा कोणाला केले लक्ष

मुंबई : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यानंतर सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचं अभिनंदन केलं. आपल्या भाषणात अजित पवार यांनी विजय वडेट्टीवाराचं कौतुक करताना मला टोमणे मारायची सवय नाही असं हात जोडून सांगितलं. त्यामुळे सभागृहात एकच हास्यकल्लोळ उमटला.

काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील विजय वडेट्टीवार यांचे अभिनंदन करत कौतुक केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, विरोधीपक्षनेत्याचं महत्व एवढं आहे की, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी भाषणाकडे जास्त लक्ष द्यायला हवं. यावर लगेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, आमचं लक्ष इकडेच आहे.

देवेंद्र फडणवीसांच्या या विधानानंतर आमचं दोघांचं लक्ष तुमच्याकडे आहे, मात्र तुमचचं आमच्याकडे लक्ष नाही, त्याला आम्ही काय करु, असा उपरोधिक टोला अजित पवारांनी लगावला. अजित पवारांच्या या विधानावरुन जयंत पाटलांसह सभागृहातील सर्व आमदार खळखळून हसू लागले. तसेच मुख्यमंत्री सभागृहातील भाषण लक्ष देऊन ऐकताय. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री लक्ष देण्यास तयार नाही. मुख्यमंत्र्यांनी आता ठरवलं पाहिजे की, नंबर वन उपमुख्यमंत्री कोण आणि नंबर टू उपमुख्यमंत्री कोण?, अजितदादांनी यावर देखील लगेच प्रत्युत्तर दिलं. नंबर वन हे (फडणवीस) आणि नंबर टू मी…यानंतर सभागृहात एकच हसा पिकला.

अजित पवार म्हणाले की, विजय वडेट्टीवार, तुमचं काम, तुमचा जनसंपर्क मोठा आहे. महाविकास आघाडीचं सरकार आणलं गेलं तेव्हा तुम्हाला बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना जशी खाती मिळाली तसं खातं मिळेल. ते मिळालं नाही, त्यावेळेस माझी आणि तुमची काय चर्चा झाली? हे तुम्हाला आणि मला माहित आहे. मी ते कुणालाच सांगणार नाही मी शब्दाचा पक्का आहे तुम्हाला माहित आहे. पण कुठेतरी माणसाला वाईट वाटतं, वेदना होतात.

विरोधी पक्षनेते पद द्यायचं म्हटलं तर तुमचं नाव दुसऱ्यांदा आलं. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे पद घेतील असं वाटलं होतं. पण जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आले आम्ही आहेच. अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो. मी कुणाचं नाव घेत नाही. गंमतीचा भाग सोडून द्या, माझा टोमणे मारायचा स्वभाव नाही हे मी कृपा करुन आपल्याला सगळ्यांना सांगतो असं अजित पवार म्हणाले आणि त्यांनी हातही जोडले.