…अन् अजितदादांनी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर हात ठेवला; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पहातच राहिले

मुंबई : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पक्षात बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने आपला दावा सांगितला होता. विरोधी पक्षनेते कोण होणार याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केली.

तसेच विरोधी पक्षनेते म्हणून ज्या सोई सवलती मिळतात त्या त्यांना देण्यात येतील असे सांगितले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या आसनावर बसवावे असेही अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. अध्यक्षांच्या या घोषणेनंतर मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवार यांच्याशी हस्तांदोलन केले. तर अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांना आपल्या बाजूला ओढले. त्याचवेळी मंत्री गुलाबराब पाटील पाठीमागून धावत आले आणि त्यांनी वडेट्टीवार यांच्याशी हात मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार यांनी दुर्लक्ष करत वडेट्टीवार यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकाजवळ नेले.

अजित पवार हे वडेट्टीवार यांना सत्ताधारी पक्षाच्या बाकाजवळ नेत असताना सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला. नवीन विरोधी पक्षनेते म्हणून घोषणा झाली आणि लगेच सत्तापक्षात आले अशा कोटी सुरु झाल्या. वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाच्या पहिल्या रांगेत बसलेले मंत्री भुजबळ, दिलीप वळसे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. हे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी वडेट्टीवार यांना विरोधी पक्षनेत्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले.