‘त्या’ घटनेवरून अजितदादा यांचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; काय म्हणाले?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकले आहेत. अजितदादा यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच सवाल केल्याचं वृत्त आहे.

सूत्रानुसार, मंत्र्यांची एक खासगी बैठक शुक्रवारी पार पडली. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णयावर चर्चा सुरू होती. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले अजितदादा?
तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे? असा सवाल अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच विचारला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असंही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले. दरम्यान, अजितदादा यांनी जाब विचारताच मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना उत्तर दिलं.

मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
मुख्यमंत्र्यांनी अजितदादांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहितीही शिंदे यांनी अजितदादांना दिल्याचं सूत्रांनी  सांगितलं.