अजितदादा राष्ट्रवादी सोडणार! शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : महाविकास आघाडी हा प्रयोग फक्त सत्तेसाठी एकत्र आलेला तीन पक्षांचा गट होता. त्यांनी त्यानंतर आपली विचारधारा वेगळी केली. त्यांच्यातील सर्वच पक्ष आपलीआपली वाट वेगळी शोधत आहेत. अशीच भूमिका अजित पवारांचीही आहे. त्यांना राष्ट्रवादीत रहायचे नाही, अशीच स्थिती सध्या आहे. त्यांनी जर महाराष्ट्राच्या विकासासाठी भाजप-शिवसेनेसोबत एकत्र यायचे ठरवले तर आम्ही त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी मांडली आहे. अजित पवारांबद्दल सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार हे अचूक टायमिंग साधण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापूर्वीही त्यांनी पहाटेच्या शपथविधीद्वारे ते दाखवून दिले होते. मात्र, त्यांना या कामासाठी मोहरा म्हणून वापरण्यात आले होते. खुद्द शरद पवारांनीच हे स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीत ते नाराज आहेत, अस्वस्थ आहेत. ही बाब काही लपून राहिलेली नाही. अजित पवार हे पार्थ पवार यांचा राजकीय बळी गेल्यापासूनच नाराज आहेत. ते वेगळी वाट तेव्हापासूनच शोधू इच्छित आहेत. मात्र, याचा अर्थ ते सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षाचा निकाल आणि अन्य घटना यामुळेच अशी भूमिका घेतील, असे नाही.

अजित पवार राष्ट्रवादी म्हणून एकत्र येणार असतील तर आम्हाला ते मान्य नाही. राष्ट्रवादी हा शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत सत्ता नको म्हणूनच आम्ही वेगळा मार्ग निवडला. अजित पवार यांच्या मागे आमदारांचा पाठींबा आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून आमदार येत आहेत. अजित पवार थेट काही बोललेच नाहीत. तरीही आमदार त्यांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत काही घडेल, याचा अर्थ तसे होईल असे नाही. राजकारणात जर तरच्या गोष्टी नसतात. अजित पवार हे सत्तासंघर्षाचा निकाल पाहून पुढील भूमिका ठरवतील, असे नाही.

अजित पवार यांचा फोन नॉट रिचेबेल होणे हे काही नवे नाही. पहाटेचा शपथविधी तुम्ही पाहिलाच आहे. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी घेतला यावरुन तुम्हाला अंदाज आला असेल. संजय राऊत ज्या प्रकारे थंडावलेले दिसत होते. त्यावरुन तुम्हाला दिसून येईल. दिशा भरकटलेले राजकारणी, अशी त्यांची ओळख आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा दोन दिवसांतच ठरणार आहे. संजय राऊतांच्या गोष्टींना महत्व देऊ नका, ते फेकण्यात एक्सपर्ट आहेत, अशीही टीका त्यांनी केली.