‘आकाशतीर’ : आत्मनिर्भर भारताचे खंबीर पाऊल

वेध

– अभिजित वर्तक

एका बाजूने विश्वासघातकी व विस्तारवादी ड्रॅगन आणि दुसर्‍या बाजूने दहशतवादाला नेहमीच खतपाणी घालणारा पाकिस्तान असे ‘सख्खे शेजारी’ भारताला मिळालेले असताना भारताला आपल्या संरक्षणासाठी नेहमीच सावध व दक्ष राहण्याची नितांत गरज आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. विशेषत: चीन स्वत:च्या वायुदलाचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढवत असताना भारताला या क्षेत्रात मागे राहून चालणार नाही. तुमच्याकडे तुमची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण आणि अनुरूप शस्त्रास्त्रे प्रणाली असायला हवी तरच ती तुमची मदत करेल, हा संरक्षणाचा मूळ सिद्धांत आहे. जर 10 देशांकडे एकाच प्रकारची संरक्षण उपकरणे असतील, तर तुमच्या सैन्याचे काही वेगळेपण राहणार नाही. वैशिष्ट्यपूर्ण आणि शत्रूला अचंबित करणारी उपकरणे व यंत्रणा विकसित करणे तेव्हाच शक्य आहे जेव्हा ती स्वदेशातच निर्मित झाली पाहिजेत. हे सारे लक्षात घेऊन शत्रूचा प्रत्येक हवाई हल्ला हवेतच निष्फळ करण्यास सक्षम असलेली अतिशय प्रभावी आणि पूर्णपणे स्वदेशी अत्याधुनिक यंत्रणा भारत विकसित करीत आहे. संरक्षण क्षेत्रात अधिकाधिक आत्मनिर्भर होण्यासाठी उचललेले हे एक महत्त्वपूर्ण असे पाऊल आहे.

संरक्षण मंत्रालयाने यासंदर्भात गुरुवारी गाझियाबाद येथील भारत इलेक्ट्रॉॅनिक्ससोबत एक करार केला आहे. या करारानुसार बीईएल भारतीय सैन्याला अत्यंत प्रभावी यंत्रणा उभारून देणार आहे. शत्रूचा प्रत्येक हवाई हल्ला हवेतच निष्फळ करण्यास सक्षम असलेली ही यंत्रणा उभारण्यास विशेष प्रकल्प हाती घेण्यात आला असून या प्रकल्पाला ‘Akashtir’ ‘आकाशतीर’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी बीईएलला 1982 कोटी रुपये मिळणार आहेत. देशाच्या संरक्षण आणि बचावाची क्षमता वाढविण्यासाठी बीईएल स्वयंचलित हवाई संरक्षण नियंत्रण आणि अहवाल प्रणाली अर्थात डीसीआरएस विकसित करणार आहे. संरक्षण क्षेत्रात आपली आयात कमी झाली पाहिजे आणि निर्यात अधिकाधिक वाढली पाहिजे, हाच मोदी सरकारचा दृष्टिकोन राहिला आहे. त्यादृष्टीने आकाशतीर प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर खासकरून गेल्या चार ते पाच वर्षांच्या काळात भारताची संरक्षणविषयक आयात 21 टक्क्यांनी घटली आहे. आपण आज संरक्षण क्षेत्रातील सामग्रीचा सर्वात मोठा आयातदार या भूमिकेकडून सर्वात मोठा निर्यातदार देश म्हणून वेगाने विकसित होत आहोत. 2022 मध्ये 13 हजार कोटी रुपये किमतीच्या संरक्षणविषयक साहित्याची निर्यात करण्यात आली आणि त्यापैकी 70 टक्क्यांहून अधिक निर्यात खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी केली आहे. पारतंत्र्याच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळातदेखील भारतात संरक्षणविषयक शस्त्रे आणि उपकरणांच्या निर्मितीचे प्रमाण लक्षणीय होते. जेव्हा आपण बाहेरच्या देशांमधून शस्त्रास्त्रे, उपकरणांची आयात करतो, तेव्हा त्याची प्रक्रिया एवढी वेळखाऊ असते की, जोपर्यंत ती आपल्या सुरक्षा दलापर्यंत पोहोचतात तोवर त्यातील बरीचशी कालबाह्य होतात. त्यामुळेच मोदी सरकारने ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या संकल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत.

संरक्षण क्षेत्रातले स्वयंपूर्णतेचे महत्त्व ओळखून मोठे महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात आहेत. आपल्या लष्कराकडे तसेच हवाई दल व नौदलाकडे भारतात निर्मित दर्जेदार उपकरणे असतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास व अभिमान अधिकच वाढीस लागतो. भारतात निर्मित वस्तूंबाबत सैनिकांच्या मनात एक वेगळाच स्वाभिमान असतो. म्हणूनच जी संरक्षण उपकरणे असतात ती दर्जेदार व प्रभावी राहतील, याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे आणि आपण आत्मनिर्भर झालो तर हे निश्चितच शक्य आहे. पूर्वीच्या काळी युद्ध वेगवेगळ्या पद्धतींनी व्हायची. आज आधुनिक काळात वेगळ्या पद्धतींनी होतात. आता पारंपरिक युद्धप्रणालीवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही. पूर्वी युद्ध सामग्रीत परिवर्तन होण्यात अनेक दशके लागायची. मात्र, आज युद्ध सामग्रीत अतिशय जलद गतीने बदल घडत आहेत. आज जी शस्त्रे आहेत, ती कालबाह्य होण्यात जास्त वेळ लागत नाही. जी शस्त्रे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत ती तर आणखी लवकर कालबाह्य होतात. ‘Akashtir’ भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शक्ती म्हणजे आपले खूप मोठे सामर्थ्य आहे. या सामर्थ्याचा आपण आपल्या संरक्षण क्षेत्रात जितका जास्त वापर करू, तेवढे आपण सुरक्षेच्या बाबतीत अधिक आत्मविश्वासू बनू. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत ही काळाची गरज आहे.

– 9422923201