Akshay Shinde Encounter : एन्काउंटरच्या 10 मिनिट आधीचा सीन; अक्षय शिंदेसोबत काय घडलं ?

राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी सायंकाळी अचानक पोलिसांशी आलेल्या चकमकीत मृत्यू झाला. या खळबळजनक घटनेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ही चकमक 10 मिनिटे चालली. 10 मिनिटांत अक्षयसोबत काय घडले ते पॉइंट-टू-पॉइंट जाणून घ्या…

बदलापूरमधील खासगी शाळेतील २ चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याबद्दल शिंदेविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल असून, अलीकडेच कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले गेले. त्याच्या दोन पत्नीनी शिंदे याने त्यांच्यासोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

दुसऱ्या पत्नीच्या आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत होते. अचानक त्याने वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला.

यात मोरे गंभीर जखमी झाले. शिंदे पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने ३ गोळ्या झाडल्या. त्यात तो गंभीर जखमी झाला, कळवा महापालिका रुग्णालयात नेल्यानंतर तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.

ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या माहितीस दुजोरा दिला. अक्षयचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

प्रत्युत्तर म्हणून अक्षयवर गोळी झाडली
बदलापूर अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे हा आरोपी होता, त्याच्यावर पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप केला होता, त्याला चौकशीसाठी नेण्यात येत होते. त्यावेळी त्याने पोलिस एपीआय नीलेश मोरे यांच्यावर गोळी झाडली. त्यात ते जखमी झाले आहेत. त्यावेळी प्रत्युत्तर म्हणून अक्षयवर गोळी झाडण्यात आली.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हलगर्जीपणा संशयास्पद ठरवून केलेले एन्काऊंटर, विरोधकांचा हल्लाबोल
शिंदे याने गोळी झाडून घेणे म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का ? अक्षय शिंदे याने गोळी नेमकी कशी झाडली ? आरोपी अक्षय पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचे हात बांधले नव्हते का ? त्याला बंदूक कशी काय त्याला मिळाली? पोलिस इतके बेसावध कसे असू शकतात? अतिशय धक्कादायक आणि संशयास्पद आहे.
निष्पाप मुलींना संरक्षण दिले गेले नाही, त्या शाळेचे संस्थाचालक अद्याप फरार आहेत. पोलिस त्यांना पकडू शकले नाहीत. पोलिस स्वतःची हत्यारे सांभाळू, शकत नाहीत. आरोपीला कायद्याने शिक्षा देण्याच्याऐवजी त्याला मारून टाकण्याचे काम करतात. सरकारला कोणाला पाठीशी घालायचे होते? काय लपवायचे होते ?
– विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते

अक्षय शिंदेची आई काय म्हणाली ?
अक्षय शिंदेच्या आईने सांगितले की, ‘पोलिसांनी जाणूनबुजून अक्षयला गोळ्या घातल्या. मी सोमवारीच अक्षयशी बोलली  होती. त्याचे आरोपपत्र आले आहे, असे तो सांगत होता. आता त्याची सुटका होणार आहे. त्याला फटाक्यांचीही इतकी भीती वाटत होती, मग अशा परिस्थितीत तो बंदुकीचा वापर कसा करणार ? पोलिसांनी त्याला जाणीवपूर्वक मारले.