---Advertisement---
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. अनेक प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. अशात आज बुधवारी हतनूर धरणाचे १८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दुसरीकडे, गिरणा प्रकल्प पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पाण्याच्या आवकेमुळे गिरणा प्रकल्पात २ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता १७ हजार २९८ दशलक्ष घनफुट (९३.५५ टक्के) पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गिरणा प्रकल्पा पाणलोट क्षेत्रात पाण्याची होणारी आवक पाहता गिरणा प्रकल्पाचा पाणीसाठा कोणत्याही क्षणी १०० टक्के होण्याची शक्यता आहे.
गिरणा व बोरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा
याशिवाय बोरी प्रकल्प पाणीसाठा ९० टक्के पर्यंत असून बोरी आणि गिरणा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पातून पुराचे अतिरीक्त पाणी गिरणा नदीपात्रामध्ये सोडण्यात येईल.
तरी गिरणा तसेच बोरी नदीकाठावरील सर्व गावातील नागरिकांना तसेच संबंधित यंत्रणांना सतर्कतेचा इशारा व पुर्वसुचना देण्यात येत आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे, विभाग जळगाव कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी दिली.