एस जयशंकर यांच्यासह सर्व 11 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. राज्यसभेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार होती, पण आता या सर्व अकरा जागांवर उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. पश्चिम बंगालमधील सहा, गुजरातमधील तीन आणि गोव्यातील एका जागेसाठी मतदानाची होणार होते.

पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या एका जागेसाठी होणारी पोटनिवडणुकीदेखील बिनविरोध झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, टीएमसी नेते डेरेक ओब्रायन यांच्यासह सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. राज्यसभेसाठी 24 जुलै रोजी मतदान होणार होते. 11 जागांपैकी तृणमूलचे सहा आणि भाजपचे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यासह राज्यसभेत भाजपची एक जागा वाढली आहे. आता राज्यसभेत भाजपच्या 93 जागा आहेत.

पश्चिम बंगालमधील कूचबिहार येथील अनंत महाराज भाजपचे उमेदवार म्हणून बिनविरोध विजयी झाले आहेत. शिवाय, टीएमसीकडून डेरेक ओब्रायन, सुखेंदू शेखर रॉय आणि डोला सेन यांना पुन्हा एकदा वरच्या सभागृहात संधी देण्यात आली आहे. याशिवाय साकेत गोखेल, समीरुल इस्लाम, प्रकाश चिक बडाइक हेदेखील तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर जात आहेत.

या निवडणुकीनंतर काँग्रेसची राज्यसभेतील एक जागा कमी झाली असून, भाजपच्या एका जागेत वाढ झाली आहे. भाजप आणि मित्रपक्षांच्या जागा मिळून 105 होतील. भाजपला पाच नामनिर्देशित आणि दोन अपक्ष खासदारांचा पाठिंबा आहे. अशा प्रकारे सरकारच्या बाजूने 112 खासदार आहेत. सरकारला बहुजन समाज पक्ष, जेडीएस आणि टीडीपीच्या प्रत्येकी एका खासदाराच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.