देशातील सर्व मुस्लिम धर्मांतर केलेले हिंदूच; गुलाम नबी आझाद यांचं मोठं विधान

नवी दिल्ली : काँग्रेस माजी नेते आणि राज्यसभेत खासदार राहिलेले गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये आझाद हिंदू आणि मुस्लिम धर्माबाबत बोलत आहेत. त्यांच्या भाषणात ते अनेक प्राचीन दाखले देखील देत आहेत. इस्लाम धर्माचा उगम १५०० वर्षांपूर्वी झालाय, पण हिंदू धर्म खूप प्राचिन आहे. भारतातील मुस्लिम हिंदू धर्मातूनच परिवर्तन केलेले आहेत, असं ते व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहेत.

गुलाम नबी आझाद डोदा जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलत होते. काश्मिरचे उदाहरण देताना ते म्हणाले की, सहाशे वर्षांपूर्वी काश्मिरमध्ये मुस्लिम नव्हते. त्यामुळे आता जे मुस्लिम येथे आहेत, ते काश्मिरी पंडितापासून परावर्तित झालेले आहेत. जगाच्या इतिहासात, इस्लाम फक्त १५०० वर्ष जुना आहे. हिंदू धर्म फार जुना आहे. १०-२० लोक मुघल सैन्यासोबत बाहेरुन आले असतील. बाकी सर्वांचे धर्म परिवर्तन झाले आहे. काश्मिर हे त्याचे एक उदाहरण आहे. ही भूमि आपलीच आहे, असं आझाद म्हणाले.

मुस्लिम बाहेरुन आले असणार आहेत. मुगल लष्करातील काही लोक मुस्लिम असतील. पण, इतर सर्व लोक हिंदू किंवा शीख धर्मातून मुस्लिम धर्म स्वीकारलेले असतील. आपण हा देश हिंदू, मुस्लिम, दलित, काश्मिरी, शिख यांच्यासाठी बनवला आहे. ही आपली भूमि आहे, आणि कोणीही येथे बाहेरुन आलेलं नाही. मी संसदेत अनेक गोष्टी पाहिल्यात ज्या तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. संसदेत एका खासदारने म्हटलं होतं की, मुस्लिम बाहेरुन आले. मी त्याचे खंडन केले होते, असेही ते म्हणाले.