मुंबई : स्वत:च्या मतदारसंघात रस्त्यात अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीला लोकप्रतिनिधी धावून गेल्याचे अनेकदा पहायला मिळते. मात्र, मतदारसंघ नसलेल्या आणि तेही मुंबईसारख्या शहरात बाहेरच्या मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जाणे अपवादात्मकच घडते. असाच प्रकार काल रात्री मुंबईत घडला. अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील रात्री मुंबईत ज्येष्ठ नागरिकांच्या एका गाडीला धक्का मारताना दिसले. कल्याणमधील एका अभियंत्याने ही दृष्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, खासदार डॉ. विखे पाटील काल दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर निघाले होते. रस्त्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची गाडी बंद पडली होती. रात्रीची वेळ असल्याने मदतीला कोणीही नव्हते. ते दोघेच प्रयत्न करीत असले तरी त्यांना शक्य होत नव्हते. हे पाहून खासदार डॉ. विखे पाटील यांनी आपले वाहन थांबविले. त्यांच्यासोबतचही मोजकेच सहकारी होते. त्यामुळे ते स्वत: खाली उतरले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गाडीला धक्का मारून त्यांची मदत केली.
केतन भोई या कल्याणमध्ये राहणार्या अभियंत्याने ही पोस्ट केली आहे. भोई यांचे शिक्षण नगरच्या विखे पाटील अभियांत्रिक महाविद्यालयात झालेले आहे. त्यामुळे त्यांनी खासदार डॉ. विखे पाटील यांना ओळखले. भोई यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, आज ऑफिस संपल्यानंतर कॅबने घरी जात असताना अंधेरी येथे ३ लोकं एका गाडीला धक्का देताना दिसले. मुंबईत असे प्रसंग फार कमी वेळा दिसतात त्यामुळे कुतूहलाने बघत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की अरे यात मध्यभागी तर आपले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आहेत. पटकन फोटो काढायचा प्रयत्न केला पण नीट फोटो घेता आला नाही. कुठलाही बडेजाव न करता नगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे आमच्या नगरचे खासदार आहेत हे बघून अभिमान वाटला. असे खासदार सर्वांना मिळो!