अमळनेर । अमळनेर शहरात शुक्रवारी रात्री दोन गटांमध्ये दगडफेक झाली असून शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी शहरात आज म्हणजेच दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दिनांक १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.
नेमकी काय आहे घटना?
शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या दरम्यान शहरातील जिनगर गल्ली आणि सराफ बाजारासह परिसराद दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. याप्रसंगी जोरदार दगडफेक करण्यात आली. दरम्यान, शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी प्रशासनाने अमळनेर शहरात कलम-१४४ लावून संचारबंदी लागू केली.
उपविभागीय अधिकारी कैलास कडलक यांनी आज म्हणजेच दिनांक १० रोजी सकाळी ११ वाजेपासून ते दिनांक १२ रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. अमळनेर शहरातील नागरिकांनी संचारबंदी काळात आपापल्या घरीच थांबून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.