अमळनेर : तालुक्यातील आनोरे येथे हळदीच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्यावरून दोन गटात लोखंडी पाईप, लाठ्याकाठ्या, लाकडी फळ्यांनी हाणामारी झाली. दोन्ही गटाच्या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरत सुभाष पाटील याने फिर्याद दिली की, १५ रोजी आनोरे गावात हळदीच्या कार्यक्रमात नाचताना दिनेश सुनील पाटील याचा धक्का पुतण्याला लागला. त्यावरून वाद झाले. त्यानंतर घरी गेल्यावर दिनेश सुनील पाटील हा हातात चाकू, भरत सुनील पाटील हातात लोखंडी रॉड, सुनील शिवदास पाटील काठी, कुणाल मधुकर पाटील हातात आशाबाई सुनील पाटील घरात घुसले. दिनेशने त्याच्या हातातील चाकूने पुतण्या निखिलवर वार केला.
निखिल जखमी होऊन त्याच्या हातातून रक्त वाहू लागले. तोच सुनील पाटील याने लोखंडी रॉड भरतच्या डोक्यात टाकला. तर दिनेशने भावजयीचे ब्लाउज फाडले आणि कुणालने हातातील लोखंडी सळईने मारहाण केली. आजूबाजूच्या लोकांनी भांडण आवरले. जाता जाता पाचही जणांनी शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पाचही जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३३३, १८९(२), १९१ (१), १९१(३), १९०, ३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.
दुसऱ्या गटातर्फे भरत सुनील पाटील यांनी फिर्याद दिली की, हळदीच्या कार्यक्रमात वाद झाल्यावर आम्ही घरी आलो, तेव्हा रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बँड बंद झाल्यावर सनी शरद पाटील लाकडी फळी, गुड्डू भरत पाटील लाकडी काठी, भरत सुभाष पाटील लोखंडी पाईप आणि शरद सुभाष पाटील लाकडी फळी घेऊन आमच्या घराच्या मागे आले. शिवीगाळ करत शरदने हातातील लाकडी फळीने डोक्यावर, हातपायावर मारून दुखापत केली, तर गुड्डू याने काठीने आणि भरत सुभाष पाटील याने वडील सुनील पाटील यांना लोखंडी पाईपने डोक्यावर, पाठीवर आणि हातावर मारून दुखापत केली. भाऊ दिनेशला सनी आणि शरद पाटील यांनी लाकडी काठी आणि फळीने मारहाण केली. आई आशाबाई भांडण आवरत असताना तिलाही मारहाण केली.
याबाबत चौघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल कैलास शिंदे करीत आहेत.