जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात अमळनेर तालुक्यात समाधानकारक पावसाऐवजी फक्त रिमझिम सरींचीच नोंद झाली आहे. ३० जुलैअखेर तालुक्यात केवळ २५.९२ टक्के पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.
अमळनेर तालुक्यातील तलाव, बंधारे, ओढे-नाले कोरडे पडले असून, भूजलपातळी झपाट्याने खालावत आहे. एकूण पेरणी क्षेत्र ६५,९५३ हेक्टर असून, पेरणीयोग्य क्षेत्र ६७,२४७ हेक्टर आहे. उर्वरित एक टक्के क्षेत्र इतर पिकांसाठी राखीव आहे. मात्र जून-जुलै या खरीप हंगामातील मुख्य महिन्यांत पावसाने दडी मारल्याने पेरण्या विलंबाने झाल्या.
अमळनेर तालुक्यात उडीद, मूग, ज्वारी, बाजरी, मका व कापसाची लागवड झाली असली तरी, पावसाच्या तुटवड्यामुळे ही पिके जीवावर उदार झाली आहेत. अनेक भागांत उशिरा पेरण्या झाल्या आहेत. तापी व पांझरा नद्या वगळता बोरीसह इतर ओढे-नाले कोरडे आहेत. ग्रामीण भागात भीतीचे व चिंतेचे वातावरण असून, नागरिक आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठीही संघर्ष
तलाव-बंधाऱ्यांत पाणी साचले नसल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. अनेक विहिरी व बोअरवेल्स अद्याप कोरड्याच आहेत.