मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल हे जोडपं जुळ्या बाळांसह अमेरिकेहून भारतात दाखल झालंय. त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली असून इशा अंबानी यांचं निवासस्थानी अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे. याप्रसंगी अंबानी कुटुंब तब्बल ३०० किलो सोने दान करणार आहे. त्यासोबतच अंबानी आणि पिरामल कुटुंबाकडून ५ अनाथाश्रम सुरु केले जाणार आहेत.
मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचा विवाह पीरामल समूहाच्या आनंद पिरामल यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला मुलगा आणि मुलगी अशी जुळी मुलं झाली आहे. अंबानी कुटुंबीयांकडून या दोन्ही जुळ्या मुलांचे नामकरणही करण्यात आले. मुलाचे नाव कृष्णा आणि मुलीचे नाव आदिया ठेवण्यात आलं. मुकेश अंबानींच्या कुटुंबात आता तीन तीन नातवंडे झाली आहेत. त्यांचा मुलगा-सून आकाश व श्लोकाला एक मुलगा आहे. त्याचे नाव पृथ्वी आहे.
मुलांच्या स्वागताला, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी वेगवेगळ्या मंदिरांच्या पुजार्यांना, साधू संतांना बोलविण्यात आलं आहे. या निमित्ताने पूजा ठेवण्यात आलीये. पूजा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आलाय. जेवणाचा स्वयंपाक करण्यासाठी जगभरातून वेगवेगळ्या केटरर्सना बोलावण्यात आले आहे. अंबानी कुटुंब त्यांच्या घरातील भव्य सोहळ्यात तिरुपती बालाजी, तिरुमला, श्रीनाथजी, नाथद्वारा आणि श्री द्वारकाधीश आणि इतर ठिकाणांसारख्या भारतातील मोठ्या मंदिरांमधून आलेला प्रसाद देणार आहेत.