तेलअवीव : तीन दिवसांपूर्वी पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने अचानक इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले आहेत. या कृत्यानंतर पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील युद्धाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो लोक जखमी झाले आहेत. या सर्व घडामोडीनंतर अमेरिकेसह, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि ब्रिटनने संयुक्त निवेदन जारी करत इस्रायला पाठिंबा दिला आहे. हमासच्या दहशतवादी कृत्यांचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. आम्ही संयुक्तपणे हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो, असं या निवेदनात म्हटलं आहे.
अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि ब्रिटनने संयुक्त निवेदनात म्हटलं की, आज फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कॉल्झ, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आम्ही सर्वजण एकजुटीने इस्रायलला पाठिंबा देतो. आम्ही हमास आणि त्यांच्या दहशतवादी कृत्यांचा निर्विवाद निषेध करतो. आमचं हमासच्या दहशतवादी कृत्यांना कोणतंही समर्थन नाही. त्यांची कृती कायदेशीर नाही. त्यामुळे त्यांचा सर्वत्र निषेध केला गेला पाहिजे. दहशतवादाला कधीही समर्थन दिलं जाऊ शकत नाही.”
“अलीकडच्या काळात झालेला हा सर्वात मोठा हल्ला असून संपूर्ण जग भयभीत झालं आहे. कारण हमासच्या दहशतवाद्यांनी लोकांच्या घरात घुसून कुटुंबांची हत्या केली. संगीत महोत्सवाचा आनंद घेत असलेल्या २०० हून अधिक तरुणांची कत्तल केली. वृद्ध महिला, मुले आणि संपूर्ण कुटुंबांचं अपहरण केलं, ज्यांना आता ओलीस ठेवलं आहे,” असं व्हाईट हाऊसने आपल्या निवेदनात म्हटलं.
इस्रायलच्या पंतप्रधानांकडून मोठं विधान
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठं विधान केलं आहे. हे युद्ध आम्ही सुरू केलं नसलं तरी या युद्धाचा शेवट आम्हीच करू, असा स्पष्ट इरादा नेतन्याहू यांनी व्यक्त केला आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हणाले, “इस्रायल युद्धाशी दोन हात करत आहे. हे युद्ध आम्हाला नको होतं. पण अत्यंत क्रूर आणि हिंसक मार्गाने हे युद्ध आमच्यावर लादण्यात आलं आहे. पण हे युद्ध इस्रायलनं सुरू केलं नसलं तरी याचा शेवट आम्हीच करणार आहोत. एकेकाळी ज्यू लोक राज्यहीन होते. काही काळासाठी ज्यू लोक निराधार होते. पण यापुढे असं चालणार नाही.”
“आपल्यावर हल्ला करून त्यांनी ऐतिहासिक चूक केली आहे, हे आता हमासला समजेल. त्यांच्या आणि इस्रायलच्या इतर शत्रूंच्या स्मरणात राहतील, असा धडा शिकवला जाईल. हमासने निर्दोष इस्रायलींवर केलेले क्रूर हल्ले मनाला चटका लावणारे आहेत. कुटुंबांची त्यांच्या घरात कत्तल करणे, भर कार्यक्रमात शेकडो तरुणांची कत्तल करणे, स्त्रिया, मुलं आणि वृद्धांचं अपहरण करणं, अगदी होलोकॉस्टमधून वाचलेल्यांचं अपहरण करणं, या गोष्टी मनाला चटका लावणाऱ्या आहेत. हमासच्या दहशतवाद्यांनी लहान मुलांना बांधलं, जाळलं आणि मारलं. ते रानटी आहेत. हमास म्हणजेच ISIS आहे,” अशा शब्दांत बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.