Amin Sayani passes away : रेडिओचा आवाज अशी ओळख असलेले अमीन सयानी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्यांचे हार्ट अॅटॅकने निधन झाले. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी ही माहिती दिली.
अमीन सयानी यांना मंगळवारी त्य़ांच्या दक्षिण मुंबई येथील घरी सायंकाळी ६ वाजता हार्ट ॲटॅक आला. त्यांना तत्काळ एच. एन. रिलायन्स फौंडेशन रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार अन्य आजार होते. मागील १२ वर्षांपासून त्यांना पाठीचे दुखणेदेखील होते. त्यामुळे ते वॉकर घेऊन चालायचे.
रेडिओ सिलोन आणि विविध भारतीवर जवळपास ४२ वर्षे सुरु असलेल्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम ‘बिनाका गीतमाला’ने यशाचे अनेक रेकॉर्ड मोडले होते. लोक प्रत्येक आठवड्याला त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. अमीन सयानी यांच्या नावावर ५४ हजारहून अधिक रेडिओ कार्यक्रम प्रोड्यूस/कम्पेअर/ व्हॉईसओवर करण्याचा रेकॉर्ड आहे. जवळपास १९ हजार जिंगल्ससाठी आवाज देण्यासाठीही अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये दाखल आहे.
त्यांनी भूत बंगला, तीन देवियां, कत्ल यासारख्या चित्रपटांमध्ये अनाऊन्सर म्हणून काम केलं होतं. रेडिओवर स्टार्सवर आधारित त्यांचा शो ‘एस कुमार्स का फिल्मी मुकदमा’ खूप लोकप्रिय ठरला होता.