नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर पुनर्रचना आणि आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू आहे. यावळी गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. व्होटबँकेचा विचार न करता काँग्रेसने सुरुवातीपासूनच दहशतवादाचा सामना केला असता तर काश्मिरी पंडितांना आपली जागा सोडून विस्थापित व्हावे लागले नसते, असे शहा यांनी म्हटले. यावेळी, या विधेयकानुसार जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या वाढविण्यात आलेल्या जागांसंदर्भातही त्यांनी माहिती दिली.
देशभरातून सुमारे 46,631 कुटुंबे आणि 1,57,967 लोकांना जम्मू-काश्मीरमधून स्थलांतर करण्यास भाग पाडले गेले, त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने हे विधेयक आणले आहे. आज मी आणलेले विधेयक ज्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना न्याय आणि अधिकार देण्याशी संबंधित असल्याचे शहा यांनी सांगितले. यावेळी, अमित शहांनी कलम ३७० चा उल्लेख करत पीओके आपलाच असल्याचं ठणकावून सांगितलं.
भारतीय निवडणूक आयोगाकडून काश्मीर विधानसभेत २ जागा काश्मिरी विस्थापितांसाठी नामांकीत केली जाईल. तसेच, एक जागा पाकिस्तानने अनाधिकृतपणे ताबा घेतलेल्या आपल्या काश्मीरच्या प्रदेशातून एका व्यक्तीला नामांकीत केले जाणार आहे, असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. आम्ही ३ जागा वाढवून त्यास कायदेशीर संरक्षण देऊन विधेयकाच्या माध्यमातून आज हे सभागृहात ठेवण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
जम्मूमध्ये यापूर्वी ३७ जागा होत्या, आता ४३ जागा झाल्या आहेत. तर, काश्मीरमध्ये यापूर्वी ४६ होत्या, आता ४७ झाल्या आहेत. विशेष म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील २४ जागा आपण आरक्षित ठेवल्या आहेत, कारण पीओके आपलाच आहे, गृहमंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केले. एकंदरीत जम्मू-काश्मीर विधानसभेत यापूर्वी १०७ जागा होत्या, आता ११४ झाल्या आहेत. तसेच, २ जागा नामांकीत केल्या जात, आता त्या ५ जागा नामांकीत केल्या जाणार असल्याचंही अमित शहांनी संसदेत चर्चेदरम्यान सांगितलं.
पीओके हमारा था, हमारा है और हमारा ही रहेगा। pic.twitter.com/6tP5BAw72e
— Vinod Tawde (@TawdeVinod) December 6, 2023