Amit Thackeray : अमित ठाकरेंसोबत काय घडलं?; मनसैनिकांनी टोलनाकाच फोडून टाकला

Amit Thackeray : टोलनाका बंद करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा टोल नाका फोडला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांना समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर थांबवून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत मनसैनिकांनी हा टोलनाका फोडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे २२ जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगर येथून सिन्नर कडे येत होते. समृद्धी महामार्गावरून येत असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर अमित ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांना अर्धा तास थांबवून ओळख देऊनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप मनसेने केला. टोलनाका कर्मचाऱ्यांनी अरेरावी आणि गैरवर्तन केल्याचा दावा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला असून या प्रकाराचा निषेध म्हणून हा टोलनाका फोडल्याचे मनसेने सांगितले आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकचे शहराध्यक्ष दिलीप दातीर, मनसे विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर नाशिक शहर उपाध्यक्ष अक्षय खांडरे,मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य शशी चौधरी,मनविसे प्रदेश कार्यकारणी सदस्य बाजीराव मते,शहर संघटक ललित वाघ,मनविसे निफाड तालुकाध्यक्ष तुषार गांगुर्डे, निफाडचे माजी तालुका अध्यक्ष शैलेश शेलार यांच्यासह मनसैनिकानी समृद्धी महामार्गावरील टोल नाका फोडला आहे.

राजपुत्र अमित ठाकरे यांचा ताफा अडवल्याने नाशिक शहरासह जिल्ह्यातील मनसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी आक्रमक होत या घटनेच्या निषेधार्थ टोलनाका फोडला आहे. त्यामुळे येत्या काळात या घटनेचे आणखी काय पडसाद उमटतात हे पाहणे देखील महत्त्वाचं ठरणार आहे.