जळगाव : वादळी वाऱ्यामुळे व हवामानावर आधारीत केळी पिकांच्या नुकसानीची नुकसान भरपाई ‘केळी फळ पीक विम्या’च्या माध्यमातुन शेतकऱ्यांना लवकर देण्यात यावी, अशी मागणी भाजप जळगाव पूर्वचे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांनी केली. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्याची नुकसानीची तक्रार सूचना दिल्यानंतर विमा कंपनीला सुद्धा ५ ते ७ दिवसाची मुदत द्यावी. त्या मुदतीत विमा कंपनीने पंचनामे पूर्ण करावेत बऱ्याचदा विमा कंपनी २० ते २५ दिवस झाल्यावर सुद्धा पंचनामे पूर्ण करत नाही जास्त दिवस झाल्यावर व पुढील हंगामासाठी शेतकऱ्याला नुकसानग्रस्त पीक शेतात ठेवता येत नाही. त्यामुळे नुकसानीचे योग्य आकलन होत नाही. त्यामूळे शेतकऱ्यांनी नुकसानी बाबत जी माहिती अपलोड केलेली आहे ती माहिती ग्राह्य धरण्यात यावी.याबाबत आपण संबंधित विमा कंपनीला आदेश द्यावेत.
तसेच अनेक वेळा वादळी वाऱ्यामुळे किंवा गारपिटीमुळे केळी पिक पूर्णतः पडत नाही पण केळीचे पाने पूर्ण फाटून जातात केळी पिकाचे मुख्य अन्नप्रक्रिया होण्यासाठी केळीचे पाने चांगली असणे आवश्यक असते म्हणून वादळी वाऱ्यामुळे पूर्णतः केळीचे पाने फाटलेली असतील तरी नुकसानग्रस्त ग्राह्य धरण्यात यावे असे म्हटले आहे.
त्यात पुढे त्यांनी हवामानावर आधारित केळी फळ पिक विमा योजना सन २०२३-२४ मधील विमा प्रस्ताव नाकारण्यात आलेल्या १०६१९ शेतकऱ्यांपैकी आपण ६८८६ विमा प्रस्ताव ग्राह्य धरून नुकसान भरपाई बाबत आदेश दिलेले होते. तरी सदर परिस्थिती बघता सर्वच नुकसानग्रस्थ शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रकारची मागणी केली आहे.