यहां परिंदा भी पर नही मार सकता…जी-20 साठी अभेद्य सुरक्षा कवच

नवी दिल्ली : जी-20 परिषदेसाठी ९ देशांचे प्रमुख नेते आणि १०० हून अधिक पाहुणे तीन दिवसांसाठी दिल्लीत येत आहेत. या जी-२० परिषदेची जोरदार तय्यारी सुरु आहे. यातील सर्वात आव्हानात्मक काम म्हणजे, सुरक्षा व्यवस्था. जी-20 च्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांच्या शक्यता पडताळून पाहिल्या गेल्या आहेत. याचा मुकाबला करण्यासाठी चोख तयारी करण्यात आली आहे.

दिल्लीत प्रगती मैदान ते पंतप्रधान निवासाच्या परिसराला नो फ्लाईंग झोनमध्ये टाकण्यात आले आहे. कोणतीही वस्तू एनडीएमसी परिसरात उडाली तर ती पाडली जाणार आहेत. यासाठी अँटी ड्रोन यंत्रणा बसवण्यात आली आहे. हॉटेलांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जात आहे. व्हीव्हीआयपी पाहुण्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अनेकदा व्हेरिफिकेशन करण्यात आले आहे. हा स्टाफ एका फ्लोअरवरून दुसऱ्या फ्लोअरवर देखील जाऊ शकणार नाहीय, अशी कार्ड यंत्रणा बसविण्यात आली आहे.

दहशतवादी हल्ला झालाच तर सुरक्षा रक्षकांना शस्त्रास्त्रांची कमतरता भासू नये यासाठी हे व्हीआयपी ज्या हॉटेलांमध्ये उतरणार आहेत तिथे फुल लोडेड शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. स्मोक ग्रेनेड, औषधे आणि इतर बॅकअप शस्त्रास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत. वायरलेस सेट बंद होऊ नये म्हणून त्याचे चार्जर, बॅटरी आदी गोष्टी देखील ठेवली आहेत. डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली शस्त्रास्त्रे तयार ठेवण्यात आली आहेत.