Kalyan News : दीर-भावजयच्या नात्याला काळिमा; राहत्या घरात… शहरात खळबळ

Kalyan News : दीर आणि भावजय या नात्याला कौटुंबिक व्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, याच  नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना कल्याणमधून समोर आली आहे. पीडित महिलेने पती आणि दिराच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पतीकडून अनैसर्गिक अत्याचार, दिराकडून लैंगिक शोषण, अशा गंभीर आरोपांमुळे या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली आहे.

30 वर्षीय पीडित महिला मूळची मुंब्रा येथील असून, तिचा विवाह मे 2014 मध्ये कल्याण येथील तरुणाशी थाटामाटात झाला होता. सुरुवातीला संसार सुखाचा होता, मात्र 2022 पासून तिच्या आयुष्यात अडचणींना सुरुवात झाली. तक्रारीनुसार, तिचा पती रात्री घरी येत अश्लील व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करीत असे. या प्रकारांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.

पीडितेने ही बाब सासू आणि नणंदेकडे सांगितली असता, त्यांनी तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून तिला उलट शिवीगाळ आणि मारहाण केली. शिवाय, पतीचे इतर स्त्रियांशी प्रेमसंबंध असल्याचे समजल्यावर त्याविषयी विचारणा केली असता, पतीने तिला बेदम मारहाण केली.

दिराकडून लैंगिक अत्याचार

महिलेने तक्रारीत नमूद केल्यानुसार, तिच्या पतीचे कुटुंब एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना, तिच्या दिराने तिच्यावर अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. यानंतर 20 डिसेंबर 2024 रोजी पीडित घरात एकटीच असताना, दिराने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

पोलीस तक्रार

सासू, नणंद, पती, आणि दिर यांच्या सततच्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून महिलेने अखेर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी पतीवर अनैसर्गिक अत्याचार, दिरावर लैंगिक अत्याचार, तसेच सासू व नणंदेवर मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांचे स्पष्टीकरण

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “महिलेच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून चौकशी अंती संबंधित आरोपींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.” या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस तपासातून पुढील माहिती उघड होण्याची शक्यता आहे.