जळगाव जिल्ह्यातील ६ लाख शिधापत्रिका धारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

 जळगाव : सर्वसामान्य नागरिकांना सण उत्सव काळात महागाईची झळ पोहचु नये, यासाठी दिवाळीनिमित्ताने शासनस्तरावरून ‘आनंदाचा शिधा’ म्हणून १०० रुपयांत रवा, डाळ, साखर, तेल या चार वस्तू देण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे गुढीपाडवा मराठी नववर्ष तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्ह्यातील सुमारे ६ लाख शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधाचा लाभ देण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्णयानुसार येत्या गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारकांना आनंदाचा शिधा प्रत्येकी १०० रुपयांत वाटप होणार आहे. आनंदाचा शिधा अंतर्गत जिल्हा पुरवठा विभागाला साखर क्विंटल, चणाडाळ क्विंटल, पामतेल क्विंटल, रवा क्विंटल ची मागणी नोंदविण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड लिंक करण्याची गरज आहे.
-सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी

जिल्ह्यात दिवाळीच्या काळात सर्वसामान्याना ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. हा आनंदाचा शिधा देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन निविदा प्रक्रिया राबविण्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात गुढीपाडव्यासह डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने १०० रुपये या अल्पदरात ‘आनंदाचा शिधा’ रवा, डाळ, साखर, तेल या जिन्नसांचा सहा लाखांवर शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, मात्र त्यासाठी शिधापत्रिका धारकांना रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे लागणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

रेशनकार्ड धारकांमध्ये समाधान
जिल्ह्यातील ६ लाखांहून अधिक शिधापत्रिका धारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत बहुतांश लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर मिळाला होता. काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाला तर काही ठिकाणी निर्धारीत केलेल्या डाळ, साखर, तेल आणि साखर या चारही वस्तू मिळाल्या तर काहींना दोनच वस्तू मिळाल्या होत्या. आता देखील होळी गुढीपाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

सव्वा सहा लाख लाभार्थी
अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार असून प्राधान्य गटात ४ लाख ९० हजार ६४०, अंत्योदय गटात १ लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण ६ लाख २४ हजार ९९७ शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.