भिवंडी | महाशिवरात्रीपूर्वीच भिवंडी तालुक्यातील पांडवगडावर चमत्कार घडला आहे. गडावरील पुरातन कुंडात शिवलिंग आणि पादुका सापडल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. शिवलिंग सापडल्याची माहिती मिळताच भाविकांनी मोठ्या संख्येने पांडवगडावर धाव घेतली असून, यंदाच्या महाशिवरात्रीला येथे विशेष पूजाअर्चा व महारुद्राभिषेक करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील वाहुली गावालगतच्या पठारावर ‘पांडव कुंड’ म्हणून ओळखले जाणारे ठिकाण आहे. येत्या महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक युवकांनी या कुंडाची स्वच्छता करण्याचे ठरवले होते. गावातील योगेश गायकर आणि त्यांचे काही सहकारी कुंडाची सफाई करत असताना त्यांना कुंडाच्या तळाशी शिवलिंग आणि पादुका आढळून आल्या.
ही माहिती मिळताच गावकरी आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गडाकडे धाव घेतली. शिवलिंग सापडल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिस आणि वनविभागाला याची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या ऐतिहासिक शोधानंतर स्वामी शिवस्वरूपानंद आणि माधव महाराज भोईर यांनी या ठिकाणाला ‘पांडूकेश्वर’ असे नाव दिले. या वेळी भक्तांनी मोठ्या संख्येने गडावर उपस्थित राहून हर हर महादेवचा जयघोष केला.
शिवलिंग सापडल्याच्या आनंदात महाशिवरात्रीला येथे विशेष पूजाअर्चा आणि १११ महारुद्र जलाभिषेक करण्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवलिंगाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाशिवरात्री २०२५: विशेष महत्त्व
महाशिवरात्री हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र दिवस मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरी होणार आहे. पंचांगानुसार चतुर्दशी तिथी २६ फेब्रुवारीला सकाळी ११.०८ वाजता सुरू होऊन २७ फेब्रुवारीला सकाळी ८.५४ वाजता समाप्त होईल. या दिवशी भगवान शिवाची विशेष पूजा, रुद्राभिषेक व उपवास ठेवण्याचे महत्त्व आहे.
भविष्यात पांडूकेश्वर हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास येईल, अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक शोधामुळे गडाचे आध्यात्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व वाढले आहे. आता याठिकाणी नियमित पूजा आणि धार्मिक विधी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवलिंग सापडल्याच्या या अनोख्या चमत्कारामुळे संपूर्ण भिवंडी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र स्थळाचे दर्शन घ्यावे, असे आवाहन स्थानिकांनी केले आहे.