..तर दंगलखोरांना उलटे टांगून फटके देऊ – अमित शहा

POLITICS  : बिहारच्या नवादा जिल्ह्यातील हिसुआ येथे भाजपाची सभा पार पडली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ‘ सासाराम आणि बिहार शरीफमधील हिंसाचार रोखण्यास अपयशी ठरल्याबद्दल नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर’ टीकास्त्र सोडले. तसेच राज्यात २०२५मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचे सरकार सत्तेवर आले तर अशा दंगलखोरांना उलटे टांगून फटके मारण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच नितीशकुमारांसाठी आता युतीची दारे कायमची बंद झाली आहेत, असेही ते म्हणाले.

काय म्हणाले अमित शहा?
पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बिहारमधील सर्वच्या सर्व ४० जागांवर भाजपच्या उमेदवारांना विजयी करण्याचे नागरिकांनी ठरविले आहे. या निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय देशातील जनतेने घेतला आहे. त्यानंतर नितीशकुमार हे आपला शब्द पाळणार नाहीत आणि राज्याची सूत्रे तेजस्वी यादव यांच्याकडे देणार नाहीत.

योध्येमध्ये राम मंदिर बांधण्यास विरोध केला होता, असा दावाही अमित शहा यांनी यावेळी केला.

नितीश बाबूंना पंतप्रधान व्हायचे आहे, तर तेजस्वी यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. या दोघांमध्ये बिहारची जनता भरडली जात आहे. तेजस्वी यांनी नितीशकुमार यांना साप, पलटूराम एवढेच नव्हे तर सरडा अशा शब्दांत संभावना केली होती. मात्र पंतप्रधान बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या नितीश यांनी त्यांच्याशीच युती केली, अशी टीकाही शहा यांनी केली.

नियोजित कार्यक्रमानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सासाराम येथेही जाणार होते. तेथे सम्राट अशोक जयंती कार्यक्रम होणार होता. मात्र तेथे हिंसाचार उफाळल्याने त्यांना तेथे जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी हिसुआ येथे सभा घेतली. याचा संदर्भ घेऊन शहा म्हणाले, सासाराममध्ये सभा न घेता आल्याने मी तेथील जनतेची क्षमा मागतो. पुढच्या दौऱ्यावेळी सासाराम येथे निश्‍चितपणे सभा घेण्यात येईल. बिहारमध्ये लवकरात लवकर शांतता प्रस्थापित व्हावी अशी प्रार्थना करतो.