अंगणवाडी सेविकेनं संपवलं जीवन, तीन वर्षांपासून विनापगार सेवा, गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी

नंदुरबार : अंगणवाडी सेविकेनं जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलका अमिताभ वळवी (वय ३३, रा. जुगणी-हिरीचापाडा ता.धडगाव, नंदुरबार ) असे आत्महत्या केलेल्या अंगणवाडी सेविकेचे नाव आहे. दरम्यान, तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता, शिवाय अधिकाऱ्यांकडून होत असलेल्‍या त्रासाला कंटाळून अंगणवाडी सेविकेने आत्महत्या केल्याचा आरोप  कुटुंबीयांनी केला असून संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी म्हसावद पोलिसांत केली आहे.

सूत्रानुसार, धडगाव तालुक्यातील जुगणीच्या हिरीचापाडा येथे मयत अलका अमिताभ वळवी (वय ३३) या आपल्या परिवासह वास्तव्यास असून त्या तेथीलच अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. दरम्यान, एकात्मिक बालविकास प्रकल्प तोरणमाळ या प्रकल्पांतर्गत अंगणवाडी केंद्रांसाठी तोरणमाळ येथे मिटींग घेण्यात आली. ही मिटींग करुन गावाकडे परत येत असताना अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केली.

दरम्यान, अंगणवाडी सेविका अलका अमिताभ वळवी (वय ३३) यांना तीन वर्षांपासून कामाचा कुठलाही मोबदला मिळत नव्हता. पगाराविना राबविणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी तिला मानसिक त्रास दिला. या त्रासाला व गरीबिला कंटाळून अंगणवाडी सेविका अलका वळवी यांनी घाटात उडी घेत आत्महत्या केल्याचा आरोप पती अमिताभ जोमा वळवी यांनी केली आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयत महिलेचे पती अमिताभ जोमा वळवी यांनी म्हसावद पोलिसांत केली आहे.