सातारा : शहीद वीर जवान अनिल कळसे यांच्या पार्थिवावर रेठरे खुर्द (ता. कराड) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून व बँड पथकातर्फे बिगुल वाजवून मानवंदना दिली. जवान अनिल कळसे हे सेनेतील बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमधील २६७ इंजिनिअर रेजिमेंटमध्ये वाहनचालक पदावर कार्यरत होते. अरुणाचल प्रदेशमध्ये शियांग येथे बुधवारी दुपारी ड्युटीवर असताना त्यांच्या वाहनावर अचानक झाड पडल्याने त्यात ते अडकले. त्यानंतर सोबत असणाऱ्या जवानांनी त्यांना त्या झाडाखालून बाहेर काढून सैन्यदलाच्या दवाखान्यात नेले; परंतु मोठ्या दुखापतीमुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. ही बातमी गुरुवारी सकाळी घरी व गावात धडकल्यानंतर अवघा गाव सुन्न झाला होता.
अनिल कळसे यांनी गावातच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर वाठार येथील दानशूर बंडो गोपाळा मुकादम विद्यालयातून बारावीची परीक्षा दिली.
लगेचच कोल्हापूर येथे सैन्य भरतीच्या प्रशिक्षणासाठी गेले. तेथूनच ते भारतीय सैन्यदलात शिपाई पदावर भरती झाले. भरतीनंतर दोन वर्षांनी त्यांचा सुनीता यांच्याशी विवाह झाला. त्यांच्या घरी वडील दिनकर, आई लीलावती, भाऊ बाळासाहेब व सुनील, पत्नी सुनीता, मुलगी श्रद्धा, मुलगा आर्यन असतात. गेल्या महिन्यात दिवाळीच्या सुटीत ते गावी आले होते.
तर ४ जानेवारीला ते पुन्हा सुट्टीवर येणार होते आणि पुढील वर्षीच सेवानिवृत्त होणार होते. २०१५-१६ मध्ये त्यांची हवालदार पदावर पदोन्नती झाली. त्यानंतर ते पुणे येथील मिल्ट्री प्रशिक्षण केंद्रात ट्रेनर म्हणून कार्यरत होते. तेथून ते सध्या अरुणाचल प्रदेशमध्ये भारतीय सैन्य दलात शियांग येथे कार्यरत होते.
अंत्यसंस्कारावेळी माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, कराडचे प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी आनंद पाथरकर, गटविकास अधिकारी विजय विभुते, नायब तहसीलदार बाबुराव राठोड, अतुल भोसले, धैर्यशील कदम यांनी शहीद जवान अनिल कळसे यांना पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.
यावेळी पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून व बँड पथकातर्फे बिगुल वाजवून मानवंदना दिली. त्यानंतर तिरंगा ध्वज कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आला. वीरपत्नी सुनिता, आई लिलावती, वडील दिनकर, भाऊ बाळासाहेब, सुनील, मुलगा आर्यन व मुलगी श्रद्धा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यानंतर मुलगा आर्यन यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे विविध आजी, माजी अधिकारी, विविध विभागाचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.