…तर अनिल पाटलांना मजबूत खाते मिळणार; वाचा नक्की काय म्हणाले मंत्री महाजन ?

जळगाव । लोकसभा निवडणुकीतही आपण एकत्र लढलो. मंत्री अनिल पाटील यांच्या मतदारसंघात ७१ हजारांचे मताधिक्य स्मिता वाघ यांना मिळाले, आता उपकाराची परतफेड म्हणून अमळनेर विधानसभा निवडणुकीत तुम्हाला ७१ हजारांपेक्षा जास्त मतांनी आमदार नव्हे; तर मंत्री निवडून द्यायचा आहे. जेवढे जास्त मताधिक्य तेवढे मजबूत खाते अनिल पाटलांना मिळेल. त्यामुळे २० नोव्हेंबरला महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणा, असे आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले.

११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी बन्सीलाल पॅलेसमध्ये महायुतीच्या बूथ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित झाल्याने संपूर्ण मैदान भरगच्च भरले होते. यानिमित्ताने अनिल पाटील यांच्यामागे मोठी ताकद उभी असल्याचे स्पष्ट झाले. आम्ही तुमच्याकडे मतदार म्हणून नव्हे; तर परिवार म्हणून पाहतो. विकासकामे हीच आपली जात समजायची. या निवडणुकीत अनेक मेळावे पाहिले; पण एवढा मोठा मेळावा कुठेच पाहिला नाही. केंद्र आणि राज्याने अनेक योजना सुरू केल्या असून, त्या सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीचे सरकार आलेच पाहिजे, जळगाव जिल्ह्यात संपूर्ण ११ जागांवर विजय मिळविण्याचा आपला संकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार स्मिता वाघ म्हणाल्या की, अमळनेरची जनता विकासाच्या मागे उभी राहणारी आहे. उदयबापू गेल्यानंतर मी संपले, असे म्हणणाऱ्यांना गिरीश महाजन यांनी चपराक दिली. महाजन यांनी मला खासदार बनवले. मी आणि अनिल पाटील यांनी पाडळसरे धरणाचा विडा उचलला असून, धरण आम्ही पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी अनिल पाटीलही निवडणार आणि आपले सरकारही स्थापन होणार, असा दावाही त्यांनी केला.

या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष जळकेकर महाराज, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार, रिपाइंचे यशवंत बैसाणे, देविदास देसले, गौरव महाजन, रामकृष्ण पाटील, अरुण पाटील, दिनेश शेलकर आदींनी मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. व्ही. आर. पाटील, 2. माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, जयश्री पाटील, विनोद पाटील, भारती सोनवणे, प्रवक्ता योगेश देसले, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शहराध्यक्ष विजय राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश पवार, शहरप्रमुख संजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष मुक्तार खाटीक तसेच महायुतीचे पदाधिकारी, बाजार समितीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक उपस्थित होते. शरद सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.

गर्दीच विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी
मंत्री अनिल पाटील म्हणाले की, आज जमलेली प्रचंड गर्दी २३ नोव्हेंबरला विजयी मिरवणुकीचा संदेश देणारी असून, अमळनेरच्या कार्यकर्त्याला कामासाठी कोणाच्या वशिल्याची गरज नाही. मी आणि स्मिता वाघ महायुतीच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी घेत आहोत. आम्ही त्यासाठी तत्पर आहोत. गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील विविध मंदिरांसाठी ५०० कोटींचा निधी दिल्याचेही त्यांनी सांगून निवडून देण्याची साद मतदारांना घातली. मंत्री अनिल पाटील यांच्या मदतीला भाजप सरसावली असल्याने मेळाव्यास गर्दी होती.

लाव रे तो व्हिडिओ…
अमळनेरमध्ये मागच्या काळात गुंडगिरी वाढली होती, तरुण दारूच्या अधीन झाले होते. ही संस्कृती मोडून काढायची आहे. भाषण चालू असताना अचानक मंत्री अनिल पाटील यांनी ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत अमळनेर येथील राजमाता जिजाऊ सूतगिरणीला मिळालेला पैसा कोल्हापूरकडे कसा वळविला गेला. घोटाळा झाल्याचे दाखवून भावनिक आवाहन व्हिडिओद्वारे करण्यात आले. या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री अनिल पाटील यांनी मंत्री महाजन यांच्याकडे केली.