---Advertisement---
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या पक्षातील समलैंगिक नेते अनिश गावंडे यांची पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्यापदी नियुक्ती केली आहे. या पदावर नियुक्त झालेला अनिश हा पहिला समलैंगिक तरुण आहे.
अनिश गावंडे (२७) हा पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता बनल्याने LGBTQIA+ समुदायाला एक आशेचा किरण मिळाला आहे. यातून त्यांना प्रोत्साहनही मिळेल की ते प्रत्येक क्षेत्रात पुढे येऊ शकतात.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती झाल्यावर अनिशने त्याच्या भावना व्यक्त केल्या. आता जरी मी राजकारणात सक्रीय झालो असलो तरी या मागे 10 वर्षांची मेहनत आहे.
2014 ला मी शाळेत असल्यापासूनच मला राजकारणाची आवड होती. पण तेव्हा माझी ओळख घेऊन मी राजकारण येऊ शकत नव्हतो. कारण तेव्हा परिस्थिती तशी नव्हती. 2019 ला मी मिलिंद देवरांसोबत काम केलं.
मी विचारधारेसोबत राहायचं ठरवलं. तेव्हा मी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे संधी मागितली आणि त्यांनी मला ती संधी दिली, असं अनिशने एका मुलाखतीत सांगितलं.
मी गे आहे… मी ते सर्वांसमोर खुलेपणाने मी स्विकारतो. माझी नियुक्ती झाल्यानंतर मला 200- 300 अभिनंदनाचे फोन कॉल्स आले. अनेकजण म्हणाले की, तुला बघून आमच्या मनात आशा निर्माण होते. पक्षाने राष्ट्रीय प्रवक्तेपदी माझी जी निवड झाली त्यात माझं ‘गे’ असणं अडथळा नाही. तर वास्तव आहे.
पक्षाने ही जबाबदारी दिल्यामुळे मी आभारी आहे. समाजासाठी आणि विशेष करून LGBTQ+ समुदायासाठी मी जे-जे करू शकेन ते-ते मला करायचं आहे, असं अनिशने सांगितलं.