बहिणीनंतर आता लाडक्या भावासांठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; ‘या’ भावांना मिळणार इतकी रक्कम

पंढरपूर: राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली असून या योजनेंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहे. मात्र, राज्य भरातून भावांना काय मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आता अशातच लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

जो तरुण 12 वी उत्तीर्ण झाला असेल, त्याला दरमहा सहा हजार रुपये दिले जातील. तर डिप्लोमा केलेल्या तरुणाला आठ हजार रुपये मिळतील. तसेच पदवीधर तरुणाला 10 हजार रुपये महिन्याला दिले जातील, अशी घोषणा त्यांनी केली. आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात शासकीय शासकीय महापूजा पार पडली.

या पूजेनंतर माध्यमांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील महिलांसाठी आपण माझी लाडकी बहिण योजना सुरू केली. आज लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता लाडक्या बहिणीप्रमाणेच आपण लाडक्या भावांसाठीही नवी योजना आणली आहे. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाईल.

बारावी झालेल्या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा धारक विद्यार्थ्यांना ८ हजार रुपये आणि डिग्रीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना १० हजार रुपये स्टायफंड दिला जाईल, असेही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. इतिहासात पहिल्यांदाच आपण भावांसाठी अशी योजना सुरू केली आहे. राज्यातील मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षणाची सुविधा दिली. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्याच प्रमाणे आता आपला लाडका भाऊ म्हणजे तरुण विद्यार्थ्यांसाठी योजना राबवली जाणार आहे. विद्यार्थी वर्षभर कंपनीत काम करेल, त्यासाठी त्याला अप्रेंटीस म्हणून काही रक्कम दिली जाईल. त्या कंपनीत तो ट्रेन होईपर्यंत त्याच्या अप्रेंटीशीपचे पैसे सरकारकडून भरले जातील, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.