---Advertisement---

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सेनेला आणखी एक धक्का, सहा नगरसेवकांनी सोडली साथ

---Advertisement---

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठी गळती लागली आहे. यापूर्वी माजी आमदार राजन साळवी, सुभाष बने आणि गणपत कदम यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा कोकणात उद्धव ठाकरेंच्या गटाला फटका बसला आहे.

दापोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि सहा नगरसेवकांनी उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा शिवसेना नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

दापोली नगरपंचायतीत महाविकास आघाडीची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही नगरसेवक शिंदे गटात गेले होते. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटातील सहा नगरसेवकही वेगळा गट स्थापन करत आहेत. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे.

या नव्याने स्थापन झालेल्या गटात एकूण १४ नगरसेवक सामील झाले असून, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिली असून, लवकरच नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव मांडला जाण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच
कोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला गळती रोखता आलेली नाही. शिंदे गटाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन टायगर’मुळे उद्धव ठाकरे गटातील अनेक नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. कोकणातील निष्ठावान शिवसैनिक मानले जाणारे राजन साळवी यांनीही ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला होता.

भास्कर जाधवही नाराज?
या सततच्या गळतीमुळे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली होती. पक्षातील गळती रोखण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा झाली. मात्र, पक्षाचे प्रमुख नेते भास्कर जाधवही पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी वेळोवेळी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. त्यामुळे भास्कर जाधवदेखील उद्धव ठाकरे यांना धक्का देणार का? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

कोकणातील गड वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे काय करणार?
कोकणात उद्धव ठाकरे यांची शिवसेना दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर गटबाजी आणि असंतोष वाढल्यामुळे पक्षातील अनेक नेते दुसऱ्या गटात प्रवेश करत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे कोकणातील आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी काय पावले उचलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment