नवी दिल्ली : सनातन धर्माचा अपमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा वेळी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी या विषयावर मौन बाळगले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली.
भाजप जे काही करते त्यात हिंदू नाही, असे विधान राहुल गांधी यांनी केले होते. यावर अनुराग ठाकूर म्हणाले की, सनातन धर्माच्या अपमानावर विरोधकांनी मौन सोडले पाहिजे. विरोधक हे सनातन धर्माचा अवमान करण्यापुरते मर्यादित आहेत. यावरून त्यांची मानसिकता दिसून येते. सनातन धर्माचा अवमान करण्याचे एकामागून एक प्रयत्न सुरू आहेत.
इंडिया विरुद्ध भारत वादावरील टिप्पण्यांबद्दल ठाकूर म्हणाले की, काही लोकांना गोंधळ पसरवण्याची आणि खोटे बोलण्याची सवय आहे. त्यांनी आयुष्यभर हेच केले आहे. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर ‘गोध्रा’सारखी घटना घडू शकते, असा दावा उद्धव ठाकरे यांनी रविववारी केला होता. यावर ठाकूर म्हणाले की, काही लोक सत्तेच्या लालसेपोटी त्यांची विचारधारा विसरले आहेत. शिवसेना संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांनी आज काय विचार केला असता. आज उद्धव ठाकरे सत्तेच्या लालसेपोटी काय करत आहेत हे मला माहीत नाही. सनातन धर्मावर बोलले जात असताना राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत.