कधी कधी मोबाईल वापरकर्ते इतके व्यस्त असतात की, त्यांना त्यांच्या बाजूला काय घटना घडली, याची पण कल्पना नसते. अशीच एक घटना घडली आहे, एक तरुणी रील बनवण्याच्या भानगडीत स्वतःचा जीव गमावून बसली, माणगावमधील कुंभे येथे ही घटना घडली. अन्वी कामदार (27 ) असे मयत तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अन्वी कामदार आपल्या सात सहकाऱ्यांसह वर्षासहलीसाठी माणगावमधील कुंभे येथे आली होती. एका कड्यावर इन्स्टाग्रामसाठी रील बनवत असताना तोल जाऊन ती 300 फूट दरीत कोसळली. तिच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती माणगाव पोलीस ठाण्यात कळवली. माणगांवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्थानिक बचाव पथकांना पाचारण केलं. दोरीच्या साहाय्यानं बचाव पथकं दरीत उतरली. यावेळी अन्वी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचं आढळलं. तिला तात्काळ स्ट्रेचरच्या साहाय्यानं दोरीनं ओढून वर काढण्यात आलं. मात्र, माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यापूर्वी तिचा मृत्यू झाला होता.
रीलच्या नादात अनेकजण आपला जीव गमावतात. अशीच घटना अन्वीसोबत घडली आहे. एक रील करण्यासाठी तरुण-तरुणी कोणत्याही थराला जाताना दिसतात, जीवावर उदार होऊन जोखीम पत्करतात. पुण्यात काही दिवसांपूर्वीच एक तरुणी मित्राचा हाताच्या सहाय्याने एका बिल्डिंगच्या खाली लटकत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.