‌Apoorvarang : अपूर्वा वाणी लिखित ‌‘अपूर्वरंग’ पुस्तकाचे थाटात प्रकाशन

Apoorvarang  : जळगाव,

मानसिक आरोग्यासाठी व्यक्त होत रहाणे आवश्यक असते. त्यातून चांगली निर्मिती होते. ‌‘अपूर्वरंग’ या पुस्तकातून प्रेरणा घेऊन जीवन समृद्ध करावे, असे प्रतिपादन केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भरतदादा अमळकर यांनी केले. ते कृपा प्रकाशनच्या प्रसिद्ध सूत्रसंचालक अपूर्वा वाणी लिखित ‌‘अपूर्वरंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते.

‌‘अपूर्वरंग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पु. ना. गाडगीळ ॲण्ड सन्स कलादालनात मोठ्या दिमाखात पार पडला.

पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भरतदादा अमळकर, अत्रे वकील फर्मचे संचालक ॲड. सुशील अत्रे, प्रा. संजय बडगुजर, लेखिका अपूर्वा वाणी, कृपा प्रकाशनचे संचालक रेवती आणि विभाकर कुरंभट्टी यांच्या हस्ते झाले. यासोबतच यावेळी ऑडिओ बुकचे प्रकाशनही प्रा. संजय बडगुजर यांच्या हस्ते झाले.

भविष्यातदेखील छापील पुस्तकांचे महत्त्व कायम राहील. मोबाईलचा कंटाळा येऊन लोक पुस्तकांकडे वळतील, असा आशावाद ॲड.सुशील अत्रे यांनी व्यक्त केला. अपूर्वरंग या पुस्तकाचे ऑडिओ बूक हे केवळ प्रज्ञाचक्षूंसाठी नसून, ते सर्वांना उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले.

प्रा. संजय बडगुजर यांनी अपूर्वा वाणी यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत ॲडिओ बुकचे स्वागत केले. कृपा प्रकाशनच्या रेवती कुरंभट्टी यांनी अपूर्वा यांची यशस्वी वाटचाल  विशद केली.

अपूर्वा वाणी यांनी सांगितले की, ‌‘पुस्तक लेखन एक वेगळीच अनुभूती आहे. समाजातील विविध घटकांतून मला मिळालेले प्रेम हे पुस्तकात उतरले आहे.’  यावेळी डी.लीट. पदवी मिळाल्याबद्दल डॉ.भरतदादा अमळकर यांचा सत्कार विभाकर कुरंभट्टी यांनी केला.

नीलिमा  सेठिया, प्रीती झारे यांनी मनोगत व्यक्त केले.  पाहुण्यांचा परिचय दीपाली सहजे यांनी करून दिला. पुष्कराज वाणी, विभाकर कुरंभट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा.संदीप केदार यांनी तर आभार सोहम वाणी यांनी मानले.

यावेळी सर्जना मीडिया सोल्यूशन्स प्रा.लि.चे कार्यकारी संचालक रवींद्र लढ्ढा, ज्येेष्ठ पत्रकार दीपक पटवे, अरुण जोशी, अनिल आपटे आदी मान्यवर तसेच वाचक, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.