शेतकऱ्यांनो, लक्ष द्या ! जळगाव जिल्हयातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महसूल विभागाकडून पंचनामे झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान मंजुर झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी गुरुवारी दिली. शिवाय अनुदानासाठी ई केवायसी आवश्यक असून, नजीकच्या आपले सरकार केंद्रांवर करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

नुकसानीपोटी मंजूर झालेले अनुदान संबंधित लाभार्थी यांना बँक खात्यावर डीबीटी द्वारे अदा करावयाचे असून त्यासाठी लाभार्थी यांनी नजीकच्या आपले सरकार केंद्रांवर ई केवायसी करणे आवश्यक आहे.

तसेच सामुहिक खातेदार असल्यास अश्या शेतकरी यांनी त्यांचे खात्यातील एका खातेदाराच्या नावाने संमतीपत्र तलाठी यांचेकडे दाखल करणे आवश्यक आहे.

जळगाव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना ई केवायसी व संमतीपत्राअभावी अनुदान वितरीत करणे प्रलंबित आहे, अश्या शेतकऱ्यांनी आपल्या नजीकच्या आपले सरकार केंद्रांवर जावुन ईकेवायसी करुन घ्यावी, सदरची सेवा ही निःशुल्क आहे.

तसेच एकापेक्षा जास्त सहधारक असलेल्या शेतकऱ्यांनी खात्यातील एका सहधारकाचे नावे संमतीपत्र करुन तलाठी यांचेकडेस तातडीने दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.