तरुण भारत लाईव्ह | जळगाव : राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी गठित समितीत जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. विद्या रत्नाकर पाटील (व्यवहारे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्यातील विधीमंडळ सदस्य, अखिल भारतीय साहित्य महामंडळ, अखिल भारतीय महानुभाव साहित्य युवामंच, जागतिक महानुभाव वासनिक परिषद यासह विविध संघटना व व्यक्तींकडून राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी करण्यात आलेली होती.
राज्यात मराठी भाषा विद्यापीठाची स्थापना केली जाणार असून त्याबाबतची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यानुसार आता या विद्यापीठाचा सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यासाठी राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. समितीकडून दोन महिन्यांत आराखडा सादर केला जाईल.
राज्यात मराठी भाषेचे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी अनेक वर्षांपासूनची मागणी होत होती. २०२३-२४च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतची घोषणा करण्यात आली. त्यावेळी अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर समिती स्थापन करण्यात आली आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेबाबत सहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. त्यात जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. विद्या रत्नाकर पाटील (व्यवहारे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातून नियुक्ती करण्यात आलेल्या प्रा. डॉ. विद्या पाटील या एकमेव आहेत.
इतर सदस्य असे
याशिवाय या समितीतील इतर पाच सदस्यांमध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, नागपूर येथील प्रा. राजेश नाईकवाडे, महाराष्ट्र विधानमंडळ मराठी भाषा समिती अध्यक्ष, अमरावती विभागाचे सहसचिव आणि अमरावती विभागातील विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक यांचा समावेश आहे.
मराठी भाषा विद्यापीठ स्थापन समितीत प्रा. डॉ. विद्या रत्नाकर पाटील यांची नियुक्ती झाल्याने शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
अशी असेल समितीची कार्यकक्षा
१. मराठी भाषा विद्यापीठाचे स्थान, आवश्यक जमीन, बांधकाम- जागेची आवश्यकता, योग्यता या सर्व बाबी विचारात घेऊन शिफारस करणे.
२. विद्यापीठ स्थापनेच्या अनुषंगाने खर्चाचा अंदाज, अध्यापक, अध्यापकेत्तर कर्मचारी किती असावेत, राज्यावर किती आर्थिक भार पडणार आहे. यासंदर्भात तपशीलवार माहिती सादर करणे.
३. विद्यापीठाचे विविध विभाग व विद्यापीठाची सर्वसाधारण रचना याबाबतचा सविस्तर आराखडा.
४. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच रोजगाराच्या संधी कशा प्रकारे उपलब्ध होतील, याबाबत शिफारस करणे.
५. पारंपारिक विद्यापीठात मराठी भाषा विभाग कार्यरत असताना, मराठी विद्यापीठ स्थापन केल्यामुळे मराठी भाषा संवर्धन करण्याकरिता गुणात्मक पडणाऱ्या फरकाची तुलनात्मक माहिती सादर करणे.
६. भविष्यात उच्च शिक्षण मातृभाषेतून देणेबाबत पर्याय उपलब्ध करुन देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे बाबत शक्यता तपासून अभियांत्रिकी, वैद्यकीय सारखे अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यासाठी आवश्यक बाबी, यंत्रणा याबाबत व तद्नुषंगिक शिफारशी करणे.
७. दूरस्थ / ऑनलाईन पद्धतीने सर्व अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्याबाबत आवश्यक यंत्रणा, अडचणी व उपाय योजना याबाबतचा अभ्यास व तपशील.
८. विद्यापीठाचे स्वरुप एकल असेल की, इतर महाविद्यालयांचे संलग्नीकरण असेल याबाबत सर्व बाबी विचारात घेऊन शिफारस करणे.
९. मराठीच्या सर्व बोली भाषांच्या संवर्धनासाठी विद्यापीठांतर्गत उपाययोजना.
१०. इतर राज्यातील अन्य भाषांसाठी स्थापित विद्यापीठांच्या कामगिरीचा अभ्यास करून मराठी भाषा विद्यापीठासाठी आवश्यक बाबी आणि येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना सुचविणे.
११. प्रस्तावित विद्यापीठात शिकविण्यात येणारे अभ्यासक्रम केंद्र शासनाच्या / विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत करण्याच्या दृष्टीने शिफारशी करणे.