---Advertisement---
जळगाव : मेहरुण पाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज नगर स्मशानभूमीतही अस्थी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेने नेरी नाका आणि शिवाजीनगर स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिवे बसवले आहेत. दोन शिफ्टमध्ये सुरक्षारक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत मेहरुण व पिंप्राळा स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
आमदार सुरेश भोळे यांनी आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांची भेट घेऊन स्मशानभूमीतील सुरक्षा त्वरित वाढवण्याचे आवाहन केले होते. मनपा आयुक्तांनी विभाग प्रमुखांच्या बैठका घेऊन जळगाव शहरातील चार स्मशानभूमींमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि दोन शिफ्टमध्ये सुरक्षा रक्षक नियुक्त करण्याचे निर्देश दिले होते. त्यावर त्वरीत अंमलबजावणी करण्यात आली आहे.
आगामी दोन दिवसांत पिंप्राळा आणि मेहरुण येथील स्मशानभूमींमध्येही सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात येणार आहे. अंधारमय असलेल्या स्मशानभूमींना उजेडात आणण्यात येणार आहे, तसेच सुरक्षा रक्षकांची नियुक्तीही करण्यात येणार आहे.
मनपाच्या भांडार विभागावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून २४ तास सेवा देणान्या सुरक्षारक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांनी सांगितले.