जागतिक बँकेकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं कौतुक

गोरखपूर : गेल्या सहा वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तरप्रदेशात केलेल्या कामाचं जागतिक बँकेनं कौतुक केलं आहे. बुधवारी जागतिक बँकेच्या २० सदस्यीय पथकानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या विकास कामांचं कौतुक केलं. राज्य सरकारने एक निवेदन जारी करत याबाबतची माहिती दिली आहे.

उत्तर प्रदेशात क्षेत्रनिहाय गरजांनुसार कृती आराखडा तयार करून काम केलं जात आहे. यामुळे देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या या राज्यात सर्वसमावेशक बदल घडून येतील, असंही जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटल्याचं सरकारद्वारे जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.

जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विशेष बैठकीदरम्यान, उत्तर प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी परस्पर सहकार्य आणि भविष्यातील कृती आराखड्यावर चर्चा करण्यात आली. जागतिक बँकेच्या पथकाने राज्यात केलेल्या विकासकामांची प्रशंसा केली, या कामगिरीसाठी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं, असं सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

या बैठकीबाबत अधिक माहिती देताना जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक परमेश्वरन अय्यर यांनी सांगितलं की, या प्रतिनिधी मंडळात जगातील १०० शक्तिशाली देशांचे प्रतिनिधीत्व करणारे लोक आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने उत्तर प्रदेशमध्ये गेल्या सहा वर्षांत बरीच चांगली कामं केली असल्याचेही परमेश्वरन यांनी नमूद केले आहे.