पुणे : राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमणं उधळली. कुणीही काही म्हणू देत, पवार साहेब नेहमी सगळ्यांना मार्गदर्शन करत असतात. राज्याला मदत होण्यासाठी शरद पवार सूचना करत असतात, मार्गदर्शन करत असतात, सहकार क्षेत्रात त्यांचे योगदान नाकारता येणार नाही, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्ती आणि संस्थांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत स्तुतीसुमणं उधळली आहे. ज्यांच्या तोंडी नेहमी साखर असते असे जेष्ठ नेते शरद पवार असा उल्लेख त्यांनी केला. शरद पवारांना कृषी क्षेत्राबद्दल आत्मीयता आहे, त्यांचा गाढा अभ्यास देखील आहे, शरद पवारांनी नेहमी मार्गदर्शन करावे ज्याचा सहकार क्षेत्राला, कृषी क्षेत्राला आणि सरकारला फायदा होणार असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहे.
देशाच्या विकासात या उद्योगाचे योगदान मोठे आहे, १०० टक्के इथोनॉल वापर करणारे वाहन तयार होतील मत व्यक्त करत सहकार क्षेत्रात अंतिम शब्द हा शरद पवारांचा मानला जातो असेही शिंदे म्हणाले. या क्षेत्रातील समस्या दूर करण्यासाठी सहकार मंत्रालय तयार करण्यात आले आहे. ज्या ज्या वेळी अमित शहा भेटत असतात त्यावेळी साखर कारखाण्याच्या समस्या मांडत असतात, केंद्र सरकार आपल्यासोबत आहे असं सांगायला देखील शिंदे विसरले नाहीत.